पु.ल देशपांडे इतिहासजमा झाले आहेत काय असा वाद कोणीतरी सुरु केला आहे. रवी आमले यांनी चिडून जाऊन असा प्रश्न कोणाला पडतोच कसा, पु.ल. इतिहासजमा झालेले नाहीत, असे लोकसत्तेत लिहिले आहे.
(हे मात्र खरे की शोकांतिकेइतके दीर्घायुष्य विनोदला लाभत नाही कारण समाज पूर्णच बदलला तर काही-काही विनोद अनाकलनीय बनतात.)
मी पु.लंचे बटाट्याचे चाळ हे पुस्तक सहावीत असताना वाचले. त्यातल्या लेखांमागच्या `प्रेरणा' तेव्हा माहित नव्हत्या. उदाहरणार्थ `गच्चीसह चाळ झालीच पाहिजे' या धमाल लेखामध्ये `मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र' या घोषणेचे विडंबन आहे हे माहित नव्हते. पण भरपूर हसायला आले. हे पुलंच्या अगणित विनोदी लेखांच्या बाबतीत माझे झालेले आहे, याचे कारण म्हणजे पु.लंची अभिजात विनोदबुद्धी आणि अप्रतिम भाषा-प्रभुत्व. आणखी मागे गेले तर चिं.वि जोशी यांच्या कथा, आणि अत्र्यांचे झेंडूची फुले, यांबाबतीतही माझा अनुभव हाच आहे: लिखाण जुने असले तरी विनोदाचा आस्वाद घेता येतो. झेंडूच्या फुलांमध्ये ज्या कवितांचे विडंबन केले आहे, त्यातील एक रामदास स्वामींचे मनाचे श्लोक सोडले तर बाकीचे कोणतेही काव्य मी वाचलेले नाही, तरीही मला अत्र्यांचे विडंबन अत्यंत आवडते. स्वतः अत्र्यांनीच प्रस्तावनेत उल्लेख केला आहे की त्यांच्या माहितीतील काही लोकांनी आयुष्यात एकच कवितेचे पुस्तक वाचले आहे, ते म्हणजे झेंडूची फुले.
वुडहाउसचे उदाहरण घ्या: तो ज्या जुन्या इंग्लंडची खिल्ली उडवतो, ते इंग्लंड त्याच्या स्वतःच्या हयातीतच परलोकवासी झाले होते. पण त्याने काय फरक पडतो? त्याची पुस्तके लाखाने खपतात. चार्ली चाप्लीनच्या ग्रेट डिक्टेटर या सिनेमाची प्रेरणा अर्थातच हिटलर (व मुसोलिनी) आहेत, पण हिटलर मरून सहा दशके उलटली तरी तो चित्रपट ताजा आहे. (हिटलरच्या कर्तुत्वाची ओळख असेल तर मग चित्रपटातला विनोद दाहक बनतो.) आज कदाचित एखाद्याला त्यातला हुकुमशहा पाहून गदाफिची आठवण येईल.
(हे मात्र खरे की शोकांतिकेइतके दीर्घायुष्य विनोदला लाभत नाही कारण समाज पूर्णच बदलला तर काही-काही विनोद अनाकलनीय बनतात.)
पुलंच्याबाबतीत मला भीती एकच आहे: त्यांच्या विनोदाचा पुरेपूर आस्वाद घेण्यासाठी वाचकाचे मराठी उत्तम असले पाहिजे. "विस्तारभयास्तव -- लेखाच्या, लेखिकेच्या नव्हे -- इथेच थांबतो" यातला विनोद कळायचा झाला तर मुळात विस्तारभय हा शब्द एरवी लेखक मंडळी कसा वापरतात हे ठाऊक पाहिजे. "Hindi is shrinking" असे जावेद अख्तर म्हणतात. ते मराठीचेही होत आहे: जुने-जुने, समर्पक शब्द लोकांना माहित नसतात. किंवा शब्दांचा नेमका अर्थ माहित नसतो. शब्दच इतिहासजमा झाले, तर लेखकांचे काय वेगळी गत होणार?
0 comments:
Post a Comment